Sunday, 3 December 2017

सृजन कार्यशाळेला १४ वर्ष पूर्ण त्यानिमित्ताने मुलांसाठी जादूची प्रयोग ही कार्यशाळा संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर 'सृजन' विभागातर्फे वस्ती पातळीवरील मुलांकरिता सृजन कार्यशाळेतर्फे विविध कार्यक्रम नियमित राबविले जातात. सृजन कार्यशाळेला डिसेंबर २०१७ मध्ये १४ वर्षं पूर्ण होत असून सृजन या कार्यक्रमाची संकल्पना प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची आहे. सृजन २०१७ या वार्षिक कार्यक्रमाची सांगता दिनांक ४ डिसेंबर २०१७ रोजी जादुगार पी. बी. हांडे यांच्या जादूची दुनिया या कार्यक्रमाने झाली.कार्यशाळेत ७५ मुलांचा समावेश होता.

एकदिवशीय कार्यशाळा संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे "सहकारी गृहनिर्माण संस्था" कायदा, नियम आणि जीएसटी यासंदर्भात एकदिवशीय माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये कायदा आणि नियम यासंदर्भात प्रभाकर चुरी तर जीएसटी विषयावरती अजीत जोशी यांनी प्रक्षिणार्थींना मार्गदर्शन केले. आजच्या कार्यशाळेत १२० जणांची उपस्थिती होती.

सुरूवातीला अजित जोशी यांनी जीएसटी म्हणजे नेमक काय आहे. कर प्रणाली कशाप्रकारे भरली जाते. जीएसटी आणि सोसायटी याबाबत लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी योग्य प्रकारे उत्तरे दिली. सध्या होत असलेले बदल शिकण्याचे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले.
त्यानंतर सोसायटी मधील कचरा व्यवस्थापन कशा प्रकारे करावा याबाबत सीमा रेडकर यांनी मार्गदर्शन केले. प्रभाकर चुरी यांनी सोसायटी कायदा आणि नियमन याबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.

Friday, 1 December 2017

चित्रपट चावडीतर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘क्राईम अ‍ॅण्ड पनिशमेंट’


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार २ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फिनलँडचे दिग्दर्शक अकी कौरीस्माकी यांचा ‘क्राईम अ‍ॅण्ड पनिशमेंट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
जगप्रसिद्ध कादंबरीकार पॅदेर दोस्तोवस्की यांच्या ‘क्राईम अ‍ॅण्ड पनिशमेंट’ या कादंबरी वरती हा चित्रपट आधारीत आहे. चित्रपटाचा नायक राईकायनेन हा एका खाटीकखान्यात काम करत असतो. तो अशा व्यक्तीचा खून करतो त्या व्यक्तीने आपल्या गाडीने नायकाच्या बायकोला जखमी केलेले असते. त्याचवेळी खूनाच्या प्रसंगी नायकाची एका तरूण मुलीशी गाठ पडते. पुढे काय होते ते पाहण्यासाठी आवश्य या. फिनलँडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अकी कौरीस्माकी हे त्यांच्या सहज सुंदर, हलक्या फुलक्या, नर्मविनोदी परंतु तितक्याच चमत्कृतीपूर्ण चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची प्रमुख पात्रे सर्व सामान्य फिनलँडर असतात. सर्व सामान्यांची सुख:दुखे:, त्यांच्या जीवनातील चढउतार ते तटस्थपणे नेटकेपणाने टिपतात.
1983 मध्ये फिनलँड येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९३ मिनीटांचा आहे.
‘क्राईम अ‍ॅण्ड पनिशमेंट’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Monday, 27 November 2017

यशवंतरावांचे निर्णय राज्याला समृध्द करणारे

सोलापूर : कृषी, उद्योग आणि जलसिंचन यात यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राला समृध्द करणारे ठरले आहेत. त्यांच्यामुळेच ख-या अर्थाने राज्याची प्रगती झाली आहे, असे विचार डॉ. शंकरराव साळुंखे यांनी व्यक्त केले.

शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, सोलापूर आणि वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. साळुंखे बोलत होते. या प्रसंगी विभागीय केंद्राचे अध्यक्ष डॉ. गो. मा. पवार, प्राचार्य डॉ. चंद्रकांत चव्हाण, विभागीय केंद्राचे सदस्य दत्ता गायकवाड, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, केंद्राचे सचिव दिनेश शिंदे, प्रा. संगमेश्वर नीला आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. गो. मा. पवार यांनी यशवंतरावांचे व्यक्तीमत्त्व नव्या पिढीला समजणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत आपले विचार मांडले.

डॉ. साळुंखे म्हणाले, समाजकारण आणि राजकारण करताना अनेक चढाओढींना यशवंतरावांना तोंड द्यावे लागले. द्विभाषिक राज्य आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्याबाबत गैरसमज निर्माण झाले होते. परंतु महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी यशवंतराव पंडीत नेहरूंना हे सारे पटवून देण्यात यशस्वी झाले. केवल प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्य यशवंतरावांनी साध्य केल्यामुळे ते शक्य झाले. आधूनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण, गृह, परराष्ट्र आदी महत्त्वाची खाती संभाळून त्याला योग्य दिशा देण्याचे काम यशवंतरावांनी केले. कला, साहित्य यासाठी त्यांचे योगदान मोठे असून कृषी उद्योग आणि जलसिंचन यात यशवंतरावांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राला समजणे कठीण आहे, असे ही ते म्हणाले. चव्हाण यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. डॉ. रेखा ओव्हाळ यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. 

Sunday, 26 November 2017

आनंदी जगण्यासाठी सुसंवाद, सकारात्मक मानसिकता, सात्विक आहार व व्यायामाची गरज - डॉ. मनोज चोपडा

नाशिक : आजच्या धावपळीच्या जगात जीवनशैलीत वेगाने बदल होत असून ताण-तणावाचे वाढते प्रमाण, सकारात्मक जीवनशैलीचा अभाव, सोशल मिडीयाच्या अतिवापरामुळे आलेले नैराश्य, उदासिनता, व्यायामाचा अभाव, व्यसनांचे वाढते प्रमाण, विसंवाद यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून ते रोखण्यासाठी आनंदी जीवनासाठी निसर्गाशी मैत्री करून सात्विक आहार, मेडीटेशन, त्याचबरोबर आपल्या मर्यादा ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी केले.

महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 33व्या पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांचे जीवनशैली व हृदयरोग या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक,विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर येथे सदर व्याख्यान संपन्न झाले.

ते पुढे म्हणाले की आज ग्लोबल वॉर्मिंग, वाढते ध्वनी प्रदुषण, औद्योगिक प्रदुषण यांचा परिणाम जीवनशैलीवर होत आहे. आज तरूण वयातच हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह यांचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी तेल, तूप, साखर, मैदा, मीठ यांचे आहारातील प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर योगा, स्वत:साठी वेळ देणे, आवडीचे छंद जोपासणे यांमुळे ताणतणाव कमी करण्यासाठी मदतच होते. शरीर हे जैविक घड्याळ आहे. ते योग्य रितीने चालण्यासाठी जीवनशैलीत शिस्त आणणे महत्त्वाचे आहे. नियमित आरोग्य तपासणी आहाराच्या वेळा निश्‍चित करणे, प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे. वेळेचे व्यवस्थापन करून आनंदी मनाने काम करण्याचे कौशल्य साधता आले पाहिजे. तिच खरी आनंदी जीवनाची गुरूकुल्ली आहे असेही डॉ. चोपडा पुढे म्हणाले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. डॉ. मनोज चोपडा यांचा परिचय प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा यांनी केला. तर सन्मान प्रतिष्ठानचे सदस्य अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केला. डॉ. रश्मी चोपडा यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सदस्य कविता कर्डक, तसेच डॉ. वासुदेव भेंडे, डॉ. मनोज शिंपी, अमर भागवत, गिरीष देवस्थळी, मंगला कमोद, कैलास पाटील, डॉ. सुभाष पवार, विनायक रानडे, रमेश देशमुख आदी उपस्थित होते.

अहमदनगर केंद्रातर्फे यशवंतराव चव्हाणची ३३ वी पुण्यतिथी साजरी...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांची ३३ वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी केली. तसेच स्व.यशवंतराव चव्हाण यांचे विचार तरूण पिढाला ज्ञात व्हावेत म्हणून स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे साहित्य, संस्कृती, शिक्षण, समाजकारण, संरक्षण या क्षेत्रातील योगदानातून महाराष्ट्राने जी घोडदौड केली आहे ती अहमदनगर केंद्रातर्फे विविध उपक्रमांतून दाखविण्यात आली. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र उभा करण्याचे काम ग्रामीण भागात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबई विभागीय केंद्र अहमदनगरच्या माध्यमातून सुरू आहे आज २५ नोव्हेंबर २०१७ रोजी स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांची ३३ वी पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा,वाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान ही आयोजित करण्यात आले होते.

वार्षिक शिक्षण परिषद संपन्न...

शिक्षण विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक शिक्षण परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये सेमी-इंग्रजी : काळ, आज आणि उद्या या विषयावर आज दिवसभरात चर्चा करण्यात आली. ह्या कार्यक्रम शनिवारी रंगस्वर' चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान, मुंबई, जन. जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई येथे राज्यभरातून आलेल्या शिक्षकांच्या उपस्थित पार पडला. या कार्यक्रमामध्ये डॉ.कुमुद बन्सल यांना उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार देण्यात आला आणि व्हाट्सअँपच्या चर्चा-शिक्षण विकासाच्या या शिक्षण विकास मंच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सेमी इंग्रजी बद्दल विद्यार्थी आणि शिक्षक यांचा टॉक शो झाला याचे सूत्रसंचालन सुदाम कुंभार यांनी केले. त्यानंतर स्वागत व कार्यक्रमाची रूपरेषा बसंती रॉय यांनी केले. कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सेमी आणि मराठी याबद्दल लोकांना मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले. तर डॉ. वसंत काळपांडे यांनी सेमी-इंग्रजी : काळ, आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन केले. नंतर राज्यातील काही तुरळक शाळांनी केलेले प्रयोग दाखविण्यात आले. प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी त्यांच्या काळातील शिक्षण क्षेत्रातील अनुभव लोकांना सांगितले.