Wednesday 15 March 2017

औरंगाबाद येथे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन १५ व १६ एप्रिल रोजी...



औरंगाबाद येथे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन १५ व १६ एप्रिल रोजी...
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शिक्षक साहित्यिक बालाजी मदन इंगळे तर
स्वागताध्यक्षपदी आ. विक्रम काळे यांची निवड...

औरंगाबाद विभाग : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई- विभागीय केंद्र औरंगाबाद, शिक्षण विकास मंच व महात्मा गांधी मिशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध शिक्षक साहित्यिक बालाजी मदन इंगळे ( उमरगा, जि. उस्मानाबाद ) यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे संमेलनाच्या निमंत्रक असून या संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी मराठवाडा शिक्षक मतदासंघाचे आ. विक्रम काळे यांची निवड संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
औरंगाबाद येथे शनिवार, दि. १५ व रविवार दि. १६ एप्रिल २०१७ रोजी सदरील संमेलन कै. वसंतराव काळे स्मृती साहित्यनगरी, रुख्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, सेव्हन हिल्स, औरंगाबाद या ठिकाणी संपन्न होईल.
अभ्यासक्रमाशी संबंधित विषयांवर, शैक्षणिक विषयांवर लिहिणारे (शिक्षणातील नवीन प्रवाह, शैक्षणिक समस्या, इत्यादी ) आणि ललित साहित्य ( कथा, कविता, नाटक, कादंब-या इत्यादी ) अशा तिन्ही अंगांनी लेखन करणारे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तिन्ही स्तरांवर काम करणारे अनेक शिक्षक महाराष्ट्रात आहेत. अशा शिक्षकांना एकत्र येऊन आपले विचार, कल्पना आणि अनुभव यांची देवाण-घेवाण करत यावी, अशा लिहित्या शिक्षकांना साहित्यिक म्हणून ओळख मिळावी व त्यांच्याकडून अधिकाधिक साहित्य निर्मिती व्हावी, हा या संमेलन आयोजनाचा प्रमुख उद्देश आहे. यापुर्वी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( विद्या परिषद ) आणि शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २०१२ साली पुण्यात पहिले राज्यस्तरीय शिक्षकांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले होते.
याचबरोबर वाचन संस्कृती वाढावी व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठीही हे संमेलन निश्चितच दिशादर्शक ठरेल. पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनात केवळ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचाच सहभाग घेण्यात आला होता. यावेळी उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांची मागणी लक्षात घेऊन दुस-या शिक्षक साहित्य संमेलनात त्यांनासुद्धा सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दोन दिवसीय संमेलनात विविध परिसंवाद, प्रकट मुलाखत, कविसंमेलन, कथाकथनासह सास्कृतिक कार्यक्रम देखील सादर होणार आहेत. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकवणा-या आणि ललित किंवा शैक्षणिक विषयावर लेखन करणा-या शिक्षकांना या संमेलनात सहभागी होता येईल. नाममात्र प्रतिनिधी शुल्कात निवास, भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या शिक्षकांना या संमेलनात प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी shikshaksahitya@gmail.com या मेल आयडीवर अथवा अभ्युदय फाऊंडेशन, कासलीवाल सुवर्णायोग, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड, गारखेडा परिसर, औरंगाबाद - ४३१००५ (दूरध्वनी क्र. ०२४०-२३५१७७९ ) येथे संपर्क साधावा.

संमेलनाच्या ऑनलाइन नोंदणीची सुरुवात करण्यात आलेली असून खालील लिंकवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून आपला सहभाग निश्चित करावा,असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
Link : http://bit.ly/ShikshakSahityaForm


No comments:

Post a Comment