Sunday 16 April 2017

राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई- विभागीय केंद्र औरंगाबाद, शिक्षण विकास मंच व महात्मा गांधी मिशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष बालाजी इंगळे, संमेलन स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ श्रीरंग देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे, सुदेश हिंगलासपूरकर, प्रदीप सोळुंके, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर यांची उपस्थिती होती. शिक्षकाच्या अंगी असलेले कलागुण जाणून घेण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या तिन्ही स्तरातील शिक्षकांना एकत्रित येऊन आपले विचार, कल्पना आणि अनुभव यांची देवाणघेवाण करता यावी. तसेच शिक्षकांना साहित्यिक म्हणून ओळख व्हावी व त्यांच्याकडून अधिकाधिक साहित्य निर्मिती व्हावी या प्रमुख उद्धेशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रंगनाथ पठारे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राथमिक पातळीवर मातृभाषेत शिक्षण घेण्याची गरज सध्याच्या घडीला आहे व लुप्त पावत चाललेली आपली मातृभाषा जोपासावी. भाषा मृत झालेली आहे तिला जागृत करण्याची वेळ आली आहे. शिक्षकांच्या अडचणी खूप आहेत त्या लोकप्रतिनिधी समजून घ्यायला हव्यात. निवडणूक, विविध सर्वेक्षण आदी कामात शिक्षकांना लोकप्रतिनिधी राबवून घेतात अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वागताध्यक्ष आ.विक्रम काळे यावेळी बोलताना म्हणाले की, या साहित्य संमेलनामुळे नक्कीच पुढचे साहित्य संमेलन आयोजित करायला ऊर्जा मिळेल. या साहित्य संमेलनाची शिदोरी युवक शिक्षक घेऊन जातील. पुढच्या साहित्य संमेलनाच्या वेळेस महाराष्ट्र सरकारकडे आम्हयी सुट्टी काढण्याचा नक्कीच प्रयंत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. अध्यक्षीय भाषणात बोलताना संमेलनाध्यक्ष बालाजी इंगळे म्हणाले शिक्षणाची ताकत, शिक्षणाचे फायदे, लिहित्या शिक्षकांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम, साहित्य विषयक लिखाण करायला हे व्यासपीठ प्रोत्साहन देत आहे. 'लिहत राहा, व्यक्त व्हा' असा संदेशही त्यांनी दिला.
या दोन दिवशीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात होऊन वि. स. खांडेकर ग्रंथनगरीचे उदघाटन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मराठवाड्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांचे विशेष सत्कार करण्यात आले. तसेच 'माझ्या लेखन प्रेरणा' हि प्रकट मुलाखत, सोशल मीडियावरील शिक्षकांचे सृजनशील लेखन, 'शब्द झुल्यावर' हे कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, 'खानदेशचा मळा मराठवाड्याचा गळा' हा बहिणाबाईंचे गीतदर्शन असे विविध कार्यक्रमाने पहिला दिवस पार पडला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात कथाकथनने झाली. त्यानंतर कवी कट्टा, 'पाठ्यक्रमातील साहित्याची निवड व निकष व वाचन संस्कृतीशी मुलांना जोपासण्यासाठी शिक्षकांची भूमिका' या विषयावर विशेष परिसंवाद साधण्यात आला.सायंकाळी ५ वाजता या दोन दिवशीय राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम पोतदार यांनी केले तर कैलास अंभोरे यांनी आभार व्यक्त केले.
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कैलास अंभुरे, डॉ. वीर राठोड, प्रा. महेश अंचितलवार, सुबोध जाधव, विनोद सिनकर, रुपेश मोरे, मंगेश निरंतर, राजेंद्र वाळके, त्रिशूल कुलकर्णी, गणेश घुले, श्रीराम पोतदार, निखिल भालेराव, विश्वनाथ ससे, मयूर देशपांडे, अक्षय गोरे, अजिंक्य गुंठे, रमेश मोरे, प्रतीक राऊत, संतोष लोमटे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment