Monday 28 August 2017

'विज्ञानगंगा'चे एकोणिसावे पुष्प 'व्हर्टिकल फार्मिंग'


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत एकोणिसावे पुष्प, डॉ. शरद पां. काळे यांचे 'व्हर्टिकल फार्मिंग' या विषयावर शुक्रवार, दिनांक १५ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ येथे गुंफणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे.

Thursday 24 August 2017

'एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण' परिसंवाद


औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद, विकास अध्ययन केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात अध्यक्ष राज्य महिला आयोग श्रीमती विजया रहाटकर, राज्यप्रमुख अॅक्शन एड श्रीमती नीरजा भटनागर स्त्री अभ्यासक श्रीमती डॉ. वृषाली किन्हाळकर या मान्यवर मंडळी मार्गदर्शन करतील. 
दुष्काळ म्हटले की, सर्वांसमोर शेतकरी व त्याची स्थिती येते. याच बरोबर दुर्लक्षित राहतो तो समाजातील दुर्बल घटक. या घटकात सर्वाधिक शोषणाच्या बळी ठरतात त्या एकल महिला. संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत फिरताना सगळीकडे परितक्त्या विधवा व घटस्फोटीत महिलांचे मोठे प्रमाण आढळले. या महिलांना कोणत्याही प्रकारचा आधार कुटूंब आणि समाजव्यवस्थेकडून मिळत नाही, असे दिसून आले, यात पुन्हा भर पडली ती दुष्काळाची. या विषयाला घेऊन 'एकल महिला व पाणीप्रश्न' या विषयावर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाच्या अनुषंगाने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शनिवारी ९ सप्टेंबर २०१७ रोजी, दुपारी ४ वाजता, महसूल प्रबोधिनी सभागृह, दुध डेअरी सिग्नल जवळ अमरप्रीत चौक, औरंगाबाद येथे सुरू होईल. नंदकिशोर कागलीवाल (अध्यक्ष), सचिन मुळे (कोषाध्यक्ष), सुरेश शेळके (वि.अ.के) निलेश राऊत, विजय कान्हेकर, रेणुका कड, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर आणि सुबोध जाधव यांनी परिसंवादाचे आयोजन केले आहे.

Wednesday 23 August 2017

विंदा करंदीकरांची जन्मशताब्दी उत्साहात साजरी


ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त त्यांच्या साहित्याचे दर्शन घडविणारा कार्यक्रम पॉप्युलर प्रकाशन, दैनिक लोकसत्ता आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विंदा करंदीकर यांचे कुटुंबीय आनंद करंदीकर, उदय करंदीकर, जया काळे, पत्रकार अंबरिश मिश्र, कवी सौमित्र (किशोर कदम), प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विंदाच्या गद्य-पद्य साहित्याचे खास शैलीत सादरीकरण केले. खोडकर मस्तीखोर छोटे होत छोट्यांच्या विश्वासात धम्माल मज्जा करणारे विविध किस्से मान्यवरांनी सांगितले.

पॉप्युलर प्रकाशनचे ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांनी विंदांची फकिरी किस्से वृत्ती सांगणारे किस्से नमूद केले. विदांनी त्यांना बक्षीस स्वरूपात मिळालेली सर्व रक्कम समाजाला वाहिली, याची आठवण भटकळ यांनी करून दिली. साहित्यकृतीचा जागर व्हावा, यासाठी या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजकत्व मोठ्या आनंदाने आम्ही स्विकारले, असे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सांगितले.

करंदीकरांच्या कन्या जया काळे यांनी 'लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तूला घरी...या कवितेच्या निर्मितेचा गमतीदार किस्सा त्यांनी ऐकविला. कवी सौमित्र यांनी विंदांच्या लघुनिबंधाचे वाचन केले. यापैकी 'पुरूष आणि पिशव्य़ा' या लघुनिबंधात लग्नानंतर पुरूष कशा पध्दतीने मान खाली घालून पिशव्या घेऊन बाजारहाटला जातात याचे काही वर्णन सांगितले. विंदांचे कनिष्ठ पुत्र उदय करंदीकर यांनी बालकाव्यसंग्रहातील काही कविता सादर केल्या. तसेच आनंद करंदीकरांनी सुध्दा त्यांच्या निवडक कवितांचे वाचन केले. 

Monday 21 August 2017

कविवर्य विंदा करंदीकर जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ....


ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दिदिनानिमित्त त्यांच्या साहित्याचे दर्शन घडविणारा कार्यक्रम.....
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य विंदा करंदीकर यांचा २३ ऑगस्ट १९१८ हा जन्मदिन. यावर्षी २३ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षास सुरुवात होत आहे. साहजिकच २०१७-२०१८ या वर्षात करंदीकरांचे चाहते, विविध साहित्यिक संस्था, प्रसार माध्यमे आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.  ह्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात पॉप्युलर प्रकाशन, दैनिक लोकसत्ता आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम दि. २३ ऑगस्ट २०१७ रोजी होत आहे. या कार्यक्रमात विंदा करंदीकर यांचे कुटुंबीय आनंद करंदीकर, उदय करंदीकर, जया काळे, पत्रकार अंबरिश मिश्र आणि कवी सौमित्र (किशोर कदम) हे विंदाच्या गद्य-पद्य साहित्याचे सादरीकरण करणार आहेत.
हा कार्यक्रम बुधवार दिनांक: २३ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ५:३० वा. रंगस्वर सभागृह, ४था मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मुंबई -४०००२१ येथे होणार आहे.

Saturday 19 August 2017

"उदाहरणार्थ नेमाडे "ला चांगला प्रतिसाद


सोलापूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत "उदाहरणार्थ नेमाडे " हा अक्षय इंडीकर दिग्दर्शित चित्रपट बार्शी, मंगळवेढा व सोलापूर शहरात ५, ६ आणि ७ ऑगस्टला आयोजन करण्यात आले होते.
  ५ ऑगष्ट रोजी यशवंतराव चव्हाण सांकृतिक भवन बार्शी येथे आनंद यात्री प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला या प्रसंगी आनंद यात्री प्रतिष्ठानचे संथापक नागेश अक्कलकोटे यांच्या पुढाकाराने बार्शी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात तरुणाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता चित्रपट निर्मितीची आवड असलेले अनेक तरुणांनी चित्रपट निर्मिती विषयी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांच्याशी संवाद साधला बार्शी येथील रोटरी क्लब, मायबोली प्रतिष्ठान, मातृभूमि प्रतिष्ठान, लायनेस क्लब हे सुध्दा सहभागी झाले.
   ६  ऑगष्ट रोजी मंगळवेढा येथे रत्न प्रभा सोशल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने  भारत टॉकीज दामाजी रोड येथे चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व चित्रपटातील जाणकारांची उपस्थिती होती. महिलांचा सहभाग अधिक होता, तसेच महिलांनी चित्रपटाविषयी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. महाराष्ट्र साहित्य परिषद, अ.भा.नाट्य परिषद या दोन्ही मंगळवेढा शाखांनी सहभाग घेतला, विभागीय केंद्राचे सदस्य श्री राहुल शहा यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची व उपक्रमाची माहिती दिली या प्रसंगी पोलीस उपअधिक्षक उपस्थित होते.
     ७ ऑगष्ट रोजी कॉलेज ऑफ फार्मसी ( शिवदारे कॉलेज ) येथे या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांनी चित्रपट निर्मिती मागचा उद्देश विषद केला. शहरातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विभागीय केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर गो.मा.पवार सदस्य व माजी खासदार धर्मण्णा सादूल सदस्य दत्ता गायकवाड, सोलापूर आकाशवाणी केंद्राचे संचालक सुनील शिनखेडे ,उद्योगपती दत्ता अण्णा सुरवसे, जे.जे.कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या प्रसंगी सोलापूर फिल्म सोसायटीचे डॉ. नवनीत तोष्णीवाल व आशय फिल्म सोसायटीचे अमोल चाफळकर यांचा सत्कार करण्यात आला. उद्योगपती दत्ता अण्णा सुरवसे यांनी ऑस्करची प्रतिकृती दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना देऊन सोलापुरकरांच्या वतीने सन्मानीत केले. 

विधी साक्षरता कार्यशाळा


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम व मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय विधी साक्षरता कार्यशाळेचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल, वसई सहकारी बँकेसमोर व चिमाजी अप्पा मैदानाजवळ, वसई येथे केले आहे. ही कार्यशाळा सामाजिक कार्यकर्ते महिला व पुरुष यांच्या करिता आहे.
पहिल्या सत्रामध्ये - स्वागत, परिचय, पुष्पगुच्छ, प्रदान, प्रास्ताविक, संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन, हुंडाबंदी शपथा नंतर विषयानुसार  १)भारतीय संविधान - अॅड. प्रमोद ढोकळे, २)कौटूंबिक अत्याचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ - अॅड. हेमंत केंजाळकर, ३)कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळापासून संरक्षण कायदा २०१३- अॅड अजय केतकर यांची व्याख्याने होतील. लगेच प्रश्नोत्तरे आणि भोजन.
दुस-या सत्रामध्ये १) पोलिस स्टेशनचे कामकाज व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ - अॅड. प्रमोद ढोकळे, २) माहितीचा अधिकार कायदा २००५ व आई-वडील, नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणकारी अधिनियम २००७ - अॅड भूपेश सामंत, ३) हिंदू विवाह कायदा - १९५५- अॅड जे.बी. पाटील यांची व्याख्याने होतील.

Friday 18 August 2017

'विज्ञानगंगा' चे अठरावे पुष्प संपन्न


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत अठरावे पुष्प, आघारकार रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथील प्राध्यापक श्री. सुरेंद्र घासकडबी यांचे 'जेनेटिक्स' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अलीकडील काळात आपण नेहमी हा रोग अनुवांशिक आहे किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग, डीएनए टेस्ट असे उल्लेख ऐकतो. पण हे जेनेटिक्स म्हणजे नक्की काय, हे सुरेंद्र घासकडबी यांनी विविध उदाहरणातून समजावून सांगितले.
एखादी वैज्ञानिक संकल्पना सामान्यांपर्यंत पोहचवायची असेल, तर क्लिष्ट भाषा टाळावी लागते.घासकडबी यांनी उपस्थितांना समजेल, अशा सुलभ भाषेत उदाहरणे देऊन जेनेटिक्स या विषयावर चित्रे दाखवून चर्चा केली. विचारलेल्या मूलभूत शंकाचे निरसन ही त्यांनी केले. 

विश्वास ग्रुपतर्फे मदन मोहन यांना स्वरवंदना


‘है तेरे साथ मेरी वफा’ मैफलीचे आयोजन
नाशिक (प्रतिनिधी) : भारतीय चित्रपट संगीतात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीताने रसिकांना अवीट व मधुर गाणी देणारे संगीतकार मदन मोहन यांचे स्मरण म्हणून रसिकांसाठी ‘है तेरे साथ मेरी वफा’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मैफील शनिवार दि.१९ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता विश्वास लॉन्स येथे संपन्न होणार आहे. सुप्रसिद्ध गायिका रागिणी कामतीकर, मिलींद धटींगण व विवेक केळकर ही गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन सुप्रसिद्ध लेखक व संगीत अभ्यासक अंबरीश मिश्र करणार आहेत. मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या गाण्यांच्या आठवणी वाद्यरचनेचा अभिनव वापर याविषयी अंबरीश मिश्र अभ्यासपूर्ण आणि सहज निवेदनात उलगडून सांगणार आहेत. अंबरीशजींच्या संगीत व्यासंगाची अनोखी भेट रसिकांना आनंद अनुभती देणारी ठरणार आहे.
मैफीलीला साथसंगत अॅबड. प्रमोद पवार (हार्मोनियम), प्रशांत महाले (कीबोर्ड), रागेश्री धुमाळ (कीबोर्ड), निलेश सोनवणे (गिटार), आदित्य कुलकर्णी (तबला), स्वरांजय धुमाळ (ढोलक), अभिजीत शर्मा (ऑक्टोपॅड) हे करणार आहेत. ध्वनीव्यवस्था तुषार बागुल यांची आहे. मैफीलीची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक, संकलेचा कन्स्ट्रक्शन, नाशिक, जुम्मा मशिद चॅरीटेबल ट्रस्ट, विश्वास लॉन्स व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मैफील संपन्न होणार आहे. मैफल सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.
फिल्मी दुनियेत मदन मोहन यांची सुरूवात गायक म्हणून झाली. १९४८ साली ‘शाहीन’ चित्रपटात लता मंगेशकर यांच्या बरोबर त्यांनी दोन युगल गीते गायली. त्यानंतर संगीतकार एस.डी. बर्मन, श्यामसुंदर यांचे सहाय्यक झाले.
१९५० मध्ये ‘ऑखे’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. २००४ मधील वीरझारा हा त्यांचा शेवटचा चित्रपट अशी चोपन्न वर्ष आपल्या मधुर संगीताने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. अजूनही त्यांच्या संगीताची मोहिनी टिकून आहे. मदन मोहन यांनी एकूण ९३ चित्रपटांना संगीत दिले असून संगीतबद्ध केलेल्या गीतांची संख्या ६६३ आहे. लता मंगेशकर, मिना कपूर, आशा भोसले, शमशाद बेगम, मोहम्मद रफी, किशोर कुमार, तलत मेहमूद, मुकेश, गीतादत्त, सुरैय्या, भूपिंदर सिंग, उदित नारायण, अमित कुमार, महेंद्र कपूर, मन्ना डे, मुबारक बेगम, उषा खन्ना, सुमन कल्याणपूर, कमल बारोट, मेहंदी हसन अशा नामांकित गायक, गायिकांनी त्यांच्याकडे गायन केले.
कौन आया मेरे मन के द्वारे, यु हसरतों के दाग, जिया ले गयो जो मोरा, तेरी आँखो के सिवा, भूली दास्ता, नैनो में बदरा छाये अशी मदन मोहन यांची अवीट गाणी रसिकांच्या ओठावर अजूनही रेंगाळत आहेत.
तरी या मैफीलीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा,  सदस्य कविता कर्डक, रऊफ पटेल, अॅ्ड नितीन ठाकरे, विश्वास को-ऑप बँकेचे उपाध्यक्ष विलास हावरे, मानद कार्यकारी संचालक मंगेश पंचाक्षरी, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅकण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी, सचिव विनायक रानडे, रेडिओ विश्वासचे समन्वयक डॉ. कैलास कमोद यांनी केले आहे.

Thursday 17 August 2017

‘चित्रपट चावडी’तर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘डियर डायरी’


 नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार १८ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध इटालीयन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांचा ‘डियर डायरी’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
     सुप्रसिद्ध इटालीयन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांच्या तीन चित्रपटांच्या मालिकेतला हा पहिला चित्रपट आहे. साधारण ४० वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण चित्रपट केले आहेत आणि भूमिकाही केल्या आहेत. मानवी नात्यामधील गुंतागुंत व आत्मशोधाच्या वाटेवर येणार्‍या अनेक अनुभवांचा वेध मोरेट्टी यांनी आपल्या चित्रपटातून मांडला आहे. चित्रपटांच्या विषयांच्या शोधात असलेला एक दिग्दर्शक म्हणजेच त्यांचा स्वत:चा प्रवास यातून मांडला आहे.
     १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी १०० मिनीटांचा आहे. ‘डियर डायरी’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Wednesday 16 August 2017

सहकारी गृहनिर्माण सोसायटी बाबत कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी गृहनिर्माण सोसायटी व्यवस्थापण, पदाधिकारी, सल्लागार, सदस्य आणि व्यवस्थापक याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  ही कार्यशाळा ११ सप्टेंबर ते १३ आक्टोबर दरम्यान होणार असून विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सहभागी होणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांला ५ हजार रूपये शुक्ल आकारण्यात येईल. तसेच प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र देण्यात येईल. कार्यशाळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई महाराष्ट्र महिला व्यासपीठ, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग येथे होईल. संपर्क संजना पवार-८२९१४१६२१६, २२०२८५९८.

Sunday 13 August 2017

युवा स्वातंत्र्य ज्योत रॅलीचे आयोजन...


नाशिक विभाग : मंगळवार, १५ ऑगस्ट २०१७ हा आपल्या देशाचा ७१वा स्वातंत्र्य दिन. अनेक हुतात्म्यांच्या योगदानामुळेच आपल्याला हे स्वातंत्र्य अनुभवायला मिळालं. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील हुतात्म्यांच्या कार्याप्रती स्मरण करण्याचा हा अभिमान दिन आहे. हा दिन प्रत्येक भारतीयाने आपापल्यापरीने साजरा केला पाहिजे हे देखील प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे आम्हास वाटते. लोकशाही मूल्य घेऊन कार्यरत असलेल्या या देशाचे आपण नागरिक म्हणून हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 'युवा स्वतंत्रता ज्योत रॅली' चे आयोजन करण्यात आले आहे.
'युवा स्वातंत्रता ज्योत रॅली' सोमवार, १४ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ७.०० वाजता हुतात्मा चौक, गंगापूर रोड (प्रारंभ ) - के. टी.एच. एम. महाविद्यालय -अशोकस्तंभ -मेहेर सिग्नल -हुतात्मा स्मारक (सीबीएस) (समारोप, रात्रौ ८.३० वाजता ) रॅलीचा समारोप होणार आहे.
सदर युवा स्वतंत्रता ज्योत रॅली ज्या सामाजिक, संघटना, संस्थांना स्वत:चे बॅनरसह सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी भूषण काळे ९६५७४३९८३३, कैलास सुर्यवंश ७७२००५२५९२ यांचेशी संपर्क साधावा. तरी या रॅलीस जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, रऊफ पटेल, अॅड नितीन ठाकरे, राजवर्धन कदमबांडे, विक्रम मोरे यांनी केली आहे. 

Saturday 12 August 2017

युवा स्वतंत्रता ज्योत रॅली २०१७...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व नवमहाराष्ट्र युवा अभियान तर्फे गेली ९ वर्ष 'युवा स्वतंत्रता ज्योत रॅली'चे आयोजन केले जात असते यदाचे हे दहावे वर्ष असून 'युवा स्वतंत्रता ज्योत रॅली २०१७' चे आयोजन सोमवार १४ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता क्रांती चौक ते पैठण गेट, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे सर्वांनी या रॅलीमध्ये भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे गरजेचे...खा. सुप्रिया सुळे



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियान विभागातर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य युवा धोरण’ या चर्चासत्रामध्ये खा. सुप्रिया सुळे बोलत होत्या. महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण सन २०१२ साली बनविण्यात आले होते. त्याला ५ वर्ष होत आली, परंतु आजही त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. दर दोन वर्षांनी युवा धोरणाचे पुनरावलोकन केले पाहिजे. यासंबंधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या माध्यमातून सदर युवा धोरणाच्या अंमलबजावणीतील त्रुटी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील असेही त्या म्हणाल्या.
आज पार पडलेल्या या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्र राज्य युवा धोरणाची वैशिष्ट्ये, शासनातर्फे आजपर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम, अंमलबजावणीबद्दलचे पुनरावलोकन या विषयांवर सविस्तर मांडणी करण्यात आली. सविस्तरपणे बनविलेल्या युवा धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये मोठी कमतरता राहिली आहे. युवा विकासासाठी नाममात्र निधीची तरतूद गेल्या दोन वर्षांमध्ये झाली आहे ही निराशाजनक बाब आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येक युवा मागे केवळ २० ते ३० रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. तसेच धोरणामध्ये नमूद केलेले अनेक उपक्रम अजूनही कागदोपत्रीच अस्तित्वात आहेत. सदर युवा धोरण बनविताना पाच वर्षांनी धोरणाचे पुनरावलोकन करण्याचे ठरलेले असतांना त्यासंबंधी कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नाही.
याबाबी लक्षात घेऊन आणि युवा दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेने पुढाकार घेण्याचे ठरविले आणि महाराष्ट्रातील विविध युवा संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत निर्मला निकेतन, सी.वाय.डी.ए. पुणे, अनुभव मुंबई, युवा, कोरो मुंबई, सृष्टीज्ञान, उमंग, संगिनी, एम.आय. टी.एस.एम, आवाज,  यासांरख्या युवांबरोबर काम करणा-या संस्था तसेच  विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला. सदर चर्चासत्रामध्ये युवा धोरणाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रासाठी खा. सुप्रिया सुळे, मुंबई विद्यापीठातील राजीव गांधी केंद्राचे डॉ. चंद्रकांत पुरी, युवा विकास अभ्यासक मॅथ्यू  मट्टम, प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, दिनेश शिंदे, डॉ. नरेंद्र काळे, निलेश राऊत, निलेश पुराडकर, महेंद्र रोकडे, नितीन काळेल आदि उपस्थित होते. निलेश राऊत यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर भूषण राऊत यांनी आभार मानले.

"राष्ट्रीय न्याय कायदा १९९९" अंतर्गत कायदेशीर पालकत्वासाठी कार्यशाळा संपन्न..





यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, नॅशनल ट्रस्ट, अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे आणि जय वकील फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय न्याय कायदा १९९९" अंतर्गत कायदेशीर पालकत्वासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरीय समिती गठीत करण्यासाठी शनिवार १२ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थिताचे आभार मानले व ऑनलाईन पद्धतीत काम करताना काही अडचणी आल्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोडविले जातील असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
जय वकील फाउंडेशन अर्चना चंद्रा यांनी काम करता करता आलेले अनुभव उपस्थितांना शेअर केले. आलेल्या अडचणीवर कशी मात करून काम करायला हवे असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर समीर घोष यांनी मार्गदर्शन केले.
ऑनलाईन पध्दतीने कशाप्रकारे काम करता येते हे कायदेशीर सल्लागार मा. उ. के. शुक्ला, प्रत्यक्ष दाखवून मार्गदर्शन केले. कल्याण आयुक्त मा. नितीन पाटील, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे बहुतांशी जिल्हाधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी व त्यांचे कर्मचारी व राष्ट्रीय न्यास पंजीकृत संस्थांचे प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Thursday 10 August 2017

"राष्ट्रीय न्याय कायदा १९९९" कार्यशाळा


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, नॅशनल ट्रस्ट, अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे आणि जय वकील फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय न्याय कायदा १९९९" अंतर्गत कायदेशीर पालकत्वासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरीय समिती गठीत करणेसाठी शनिवार दिनांक १२ ऑगस्ट, २०१७ रोजी सांस्कृतिक सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, येथे सकाळी ९.३० ते ४ वाजेपर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 
ऑनलाईन पध्दतीने कशाप्रकारे काम करता येईल या संदर्भात कायदेशीर सल्लागार मा. उ. के. शुक्ला, हे मार्गदर्शन करणार आहेत. कल्याण आयुक्त मा. नितीन पाटील, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी व त्यांचे कर्मचारी व राष्ट्रीय न्यास पंजीकृत संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

जीएसटी मुळे प्रादेशिक असमतोल वाढण्याची भीती? - अभय टिळक



पुणे : 'एक देश एक कर' ही देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी नीट बसविण्यासाठी अत्यावश्यक बाब असली तरी, प्रचंड प्रमाणात असलेल्या विकासाच्या असमतोल असलेल्या भारतामध्ये ही दरी आणखीनच वाढेल अशी भीती ज्येष्ठ अर्थतज्ञ अभय टिळक यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुणे केंद्राच्या वतीने पत्रकार भवन आयोजित 'जीएसटी: काही अनुत्तरित प्रश्न' या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
जीएसटी लागू झाल्यापासून त्याचे फायदे आणि तोटे याबाबत खूप मोठा बागुलबुवा निर्माण केला असून, महागाई आटोक्यात येईल किंवा भारताचा जीडीपी वाढेल असे भाकीत करणे आत्ता तरी शक्य वाटताना दिसत नाही. तरीही जीएसटी लागू करणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक होते. भारतासारख्या मोठ्या देशात जी.एस.टी सारख्या प्रमाणिकृत कायद्यांची अंमलबजावणी किचकट प्रक्रिया असते. त्यासाठी घाई मध्ये टोकाचा जल्लोष किंवा टोकाचा प्रतिरोध करायची गरज नाही. या कायद्याने काही चमत्कार होईल अशी धारणा ठेवणे चुकीचे आहे. हा इतर कोणत्याही कायद्याप्रमाणे अनेक वर्ष अमलात आल्यावर त्याचे मुल्यांकन करता येईल."
असे प्रतिपादन त्यांनी केले.
आज पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत 'जी.एस.टी : काही अनुत्तरीत प्रश्न' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी नामवंत अर्थतज्ञ डॉ. अभय टिळक होते. या चर्चासत्रात सी.ए व कर सल्लागार प्रसाद झावरे पाटील, सी.ए वृषाली लोढा व जीएसटी उपायुक्त राजलक्ष्मी कदम यांनी सहभाग घेतला. जी.एस.टी कायदा लागू झाल्यापासून जनमानसात या कायद्याबाबत टोकाची भीती व टोकाचा पाठींबा अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने, त्याची सारासार चर्चा व्हावी यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
सी.ए वृषाली लोढा यांनी जी.एस.टी कायद्याची संकल्पना, त्यातील बारकावे व प्रक्रीयेची ओळख करून दिली. त्यांच्यानंतर  सी.ए प्रसाद झावरे पाटील यांनी तांत्रिक व कायदेशीर बाबींमध्ये कायदा कितीही स्पष्ट व अभेद्य वाटत असला तरी त्याच्या अंमलबजावणीत कुठल्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात व त्यामुळे कायद्यात आणखी सुधारणा व स्पष्टता येत राहायला हवी, असे स्पष्ट केले.
सरकारच्या वतीने भूमिका मांडत राजलक्ष्मी कदम यांनी कायद्यातील बारकावे, सरकारची भूमिका, कायदेशीर तरतुदी, कमतरता व त्यांची अपरिहार्यता याबाबत मार्गदर्शन केले. व्यापारी वर्गाने घाबरून न जाता या नव्या कर व्यवस्थेचा अंगीकार करावा, शासन त्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, यशवंतराव प्रतिष्ठानचे पुणे समन्वयक श्रीराम टेकाळे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर श्री. दत्ता बाळसराफ व श्री. अंकुश काकडे उपस्थित होते.  

Saturday 5 August 2017

जीएसटी काही अनुत्तरीत प्रश्न ? चर्चासत्र


पुणे : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई. विभागीय केंद्र-पुणे आणि नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष चर्चासत्र कार्यक्रमांतर्गत जीएसटी काही अनुत्तरीत प्रश्न ? या विषयावर गुरुवार दिनांक १० ऑगस्ट दुपारी २ वाजता, पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अभय टिळक अर्थतज्ज्ञ  हे अध्यक्ष असतील, तसेच सुरेंद्र मानकोसकर, अतिरिक्त आयुक्त, जीएसटी, पुणे विभाग, प्रसाद झावरे पाटील, सी. ए. (कर सल्लागार), आणि वृषाली लोढा, सी. ए. (कर सल्लागार) हे सर्व प्रमुख वक्ते असून लोकांना मार्गदर्शन करणार आहेत.

Friday 4 August 2017

"पौष्टिक सॅलडस्"बाबत महिलांना मार्गदर्शन


सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या खाण्याच्या म्हणजेच आहाराच्या सवयी बदलल्या आहेत. जंक फूड व फास्टफूड मुळे स्वत:च्या आरोग्याकडे व आहाराकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचे दुष्परिणाम फार त्रासदायक होतात. तेव्हा आपल्या आहाराविषयी सतर्क रहाणे फार गरजेचे आहे. चौकस आहारात सॅलडचे फार महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई महाराष्ट्र महिला व्यासपीठतर्फे सुप्रसिध्द शेफ तुषार प्रीती देशमुख यांचा "आई आणि स्वयपांक घर" हा मनोगत, गप्पा व प्रश्न उत्तरे व पदार्थ्यांची पाककृती असा चौरस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सुरूवातीला महाराष्ट्र महिला व्यासपीठ विभागाच्या संयोजिका रेखा नार्वेकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले, आणि कार्यक्रमाला सुरूवात झाली. सुप्रसिध्द शेफ तुषार प्रीती देशमुख यांनी आपली ओळख सांगून आज कोणती पौष्टिक सॅलडस् तयार करणार आहोत याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर सोबत आणलेल्या सॅलड वस्तू दाखवल्या, तसेच त्यांनी पडवळ कोशिंबीर, व्हेजिटेबल सलाड, चंक सलाड आणि स्प्राऊट स्पाईस हे सॅलड उपस्थित महिला समोर तयार केले. महिलांनी विचारलेल्या प्रश्नांचे नेमके उत्तर देशमुख दिले.

"स्मरण" या कार्यक्रमांतर्गत चर्चासत्र


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, मानव फाउंडेशन आणि टाटा इन्स्टिटयुट ऑफ सोशल सायन्य यांच्या संयुक्त विद्यमाने अपंग प्रवर्गातील "मानसिक आजारी" प्रौढांसाठी व त्यांच्या पालकांसाठी दिनांक ६ ऑगस्ट २०१७ रोजी बेसमेंट हॉल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-४०००२१ येथे सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत "स्मरण" या कार्यक्रमांतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी "मानसिक आजार" या विषयाचे जाणकार डॉक्टर, तज्ज्ञ व्यक्ती, पालक संघटनांचे प्रतिनिधी, पालकवर्ग आदी व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.    

Thursday 3 August 2017

चित्रपट चावडीतर्फे 'उदारणार्थ नेमाडे'


सोलापूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र सोलापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी कार्यक्रमांतर्गत अक्षय इंडिकर दिग्दर्शित उदारणार्थ नेमाडे हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मा. दिलीप सोपल साहेब सदस्य-यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच मा. अक्षय इंडिकर दिग्दर्शक प्रमुख पाहूणे, डॉ. सदानंद भिळेगांवकर अध्यतक्ष रोटरी क्लब, डॉ. शरद पाटील अध्यक्ष-लायन्स क्लब, मा. संतोष ठोंबरे अध्यक्ष-मातृभूमी प्रतिष्ठान, मा. गणेश भंडारी अध्यक्ष-मायबोली प्रतिष्ठान, सौ. वैभवी बुडूख अध्यक्ष-लायनेस क्लब आणि मा. नागेश अक्कलकोटे अध्यक्ष-आनंदी यात्री प्रतिष्ठान यांची प्रार्थनिय उपस्थिती असेल.
शनिवारी दिनांक  ५ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन बार्शी उद्घाटन समारंभ होईल. त्यानंतर तिथे उदारणार्थ नेमाडे हा चित्रपट दाखवला जाणार आहे. रविवारी दिनांक ६ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता भारत टॉकीज, दामाजी रोड, मंगळवेडा येथे उदारणार्थ नेमाडेचा दुसरा शो दाखवण्यात येणार आहे. सोमवारी दिनांक ७ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता कॉलेज ऑफ फार्मशी (शिवदारे कॉलेज). जुळे सोलापूर येथे उदारणार्थ नेमाडेचा तिसरा शो दाखवण्यात येणार आहे.

विद्यार्थी आरोग्य शिबीर



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई न्यू होरायाझान्सा  हेल्थ एन्ड रिसर्च फाउंडेशन,इंडियन अॅकॅडमी पेडीयेट्रिक्स, आणि आयोजित विद्यार्थी आरोग्य शिबीर रयत शिक्षण संस्थंचे वाघे माध्यमिक शाळा येथे संपन्न...
उषादेवी पांडुरंग वाघे माध्यमिक शाळा, कुलाबा येथे रविवारी दि. ३० जुलै २०१७ विद्यार्थी आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात एकूण २५२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, मुलांची वय व त्यानुसार त्यांची उंची आणि वजन, श्वासंक्रीयेचा वेग, त्वचेचे आजार, पचन संस्थेशी सबंधित तक्रारी, विटामिन, कॅल्शियम, बि-१२ अश्या प्रकारच्या तपासणी करण्यात आल्या. या तपासणी मध्ये अंदाजे २९ विद्यार्थ्यांना चष्मा , ११ विद्यार्थ्यांना दातासंबधी तक्रार, १३ विद्यार्थ्यांना अॅनिमिया ह्या तक्रारी असल्याचे आढळले. यावर त्यांना आवश्यक ती औषधे देण्यात आली. तसेच तपासणी दरम्यान मुलांशी संवाद साधतांना डॉक्टरांनी त्यांच्या अभ्यासात येणा-या  अडचणी शोधून काढल्या व किती विद्यार्थ्यांना हा त्रास आहे हे संबंधीत शिक्षकांना  समजावून सांगितले.
या शिबिरात ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी घेण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनावेळी डॉ. समीर दलवाई (बालरोग तज्ञ) आणि त्यांची टीम यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला विद्यार्थी आणि पालक यांना एकत्र बसवून डॉ. दलवाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या दिनचर्येबद्दल चर्चा केली. मुले सकाळी न्याहारी करत नाही व त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम कसा व काय होतो, तसेच बाहेरचं अन्न खाल्यामुळे होणारे दुष्परिणाम, तर योग्य वेळी पौष्टिक खाणे व शरीरास आराम, म्हणजे हवी तशी झोप ह्याचे नियोजन कसे करावे हे अगदी हसत्या खेळत्या वातावरणातून डॉ. समीर दलवाई यांनी मुलांना समजावून सांगितले. तसेच ह्या छोट्याश्या चर्चेतून पालकांना सुद्धा कानमंत्र मिळाला. तसेच मुलांनी सकाळी शाळेत जाण्याअगोदर कमीतकमी १ तास आधी उठणे गरजेचे आहे. म्हणजे मुले सकाळी  न्याहारी स्वतः हून मागतात. परंतु जे खातील ते पौष्टिक असावे याची काळजी घ्यावी. अभ्यासाची वेळ सुद्धा मुलांना ठरवून दिली कि, त्यांना त्यांच्या खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
       डॉ. समीर दलवाई व डॉ. दीप्ती मोडक इतर डॉक्टरांचा समूह यांनी हे आरोग्य शिबीर यशस्वीपणे पूर्ण केले. या शिबिराला शाळेचे प्राध्यापक श्री. सुरेश धनावडे आणि वाघे हायस्कूल चे सर्व शिक्षक या शिबिरात प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ आणि मुख्य वित्त व लेखा व्यवस्थापक महेश चव्हाण यांची उपस्थिती होती. 

चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी ‘मार्कोसे ऑफ ओ’


नाशिक  : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार ४ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक एरिक रोहमर यांचा ‘मार्कोसे ऑफ ओ’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स),
ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
अठराव्या शतकात उत्तर इटलीमध्ये घडणारे हे कथानक ‘मार्कोसे ऑफ ओ’ एका तरूण, सुशील व सुंदर विधवा तरूणीची गोष्ट सांगते. त्या छोट्या लष्करी छावणीवजा शहरामध्ये रशियन सेनेचा हल्ला होतो. ‘मार्कोसे ऑफ ओ’ वर बलात्काराचा प्रसंग ओढवतो व त्यातुन ‘ओे’ला एक उमदा तरूण रशियन सैन्याधिकारी वाचवतो. काही काळानंतर ‘ओ’ला ती गरोदर असल्याची जाणीव होते आणि तिच्या पोटात वाढणार्‍या गर्भातील पित्याचा शोध सुरू होतो. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी १०२ मिनीटांचा आहे.
न्यू सिनेमाच्या लाटेमधील एरिक रोहमर अपरिचित पण महत्त्वपूर्ण दिग्दर्शक आहे. चाळीसहून अधिक दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. खास फ्रेंच ठसा असलेला एरिकचा सिनेमा म्हणजे थेट सरळ, सर्वसामान्यांच्या आयुष्यातील सहज घटना टिपणारा त्यातून आपल्याला सौंदर्यदृष्टी, नातेसंबंधाची जाणीव सहजपणे जाणवते.
‘मार्कोसे ऑफ ओ’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.