Monday 27 November 2017

यशवंतरावांचे निर्णय राज्याला समृध्द करणारे

सोलापूर : कृषी, उद्योग आणि जलसिंचन यात यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राला समृध्द करणारे ठरले आहेत. त्यांच्यामुळेच ख-या अर्थाने राज्याची प्रगती झाली आहे, असे विचार डॉ. शंकरराव साळुंखे यांनी व्यक्त केले.

शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, सोलापूर आणि वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. साळुंखे बोलत होते. या प्रसंगी विभागीय केंद्राचे अध्यक्ष डॉ. गो. मा. पवार, प्राचार्य डॉ. चंद्रकांत चव्हाण, विभागीय केंद्राचे सदस्य दत्ता गायकवाड, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, केंद्राचे सचिव दिनेश शिंदे, प्रा. संगमेश्वर नीला आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. गो. मा. पवार यांनी यशवंतरावांचे व्यक्तीमत्त्व नव्या पिढीला समजणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत आपले विचार मांडले.

डॉ. साळुंखे म्हणाले, समाजकारण आणि राजकारण करताना अनेक चढाओढींना यशवंतरावांना तोंड द्यावे लागले. द्विभाषिक राज्य आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्याबाबत गैरसमज निर्माण झाले होते. परंतु महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी यशवंतराव पंडीत नेहरूंना हे सारे पटवून देण्यात यशस्वी झाले. केवल प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्य यशवंतरावांनी साध्य केल्यामुळे ते शक्य झाले. आधूनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण, गृह, परराष्ट्र आदी महत्त्वाची खाती संभाळून त्याला योग्य दिशा देण्याचे काम यशवंतरावांनी केले. कला, साहित्य यासाठी त्यांचे योगदान मोठे असून कृषी उद्योग आणि जलसिंचन यात यशवंतरावांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राला समजणे कठीण आहे, असे ही ते म्हणाले. चव्हाण यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. डॉ. रेखा ओव्हाळ यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. 

No comments:

Post a Comment