Tuesday 28 February 2017

'विचारकुंकू' कार्यक्रम संपन्न



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या ठाणे विभागीय केंद्र आणि रोटरी कल्ब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विचारकुंकू’ अभिनव उपक्रम नूकताच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे, सहयोग मंदीर, ठाणे पश्चिम येथे संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांची मुलाखत प्रा. अनुया धारप आणि पूजा प्रधान यांनी घेतली.
महिला सक्षमीकरणाच्या हेतूने नामवंत प्रतिष्ठीत महिलांचे मार्गदर्शन सर्वसामान्य महिलांना मिळावे या कारणास्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला त्यांनी इतर राज्यांच्या तूलनेत महाराष्ट्रातून केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परिक्षेची तयारी महाविद्यालयात असल्यापासून करावी लागते. आज दक्षिणेतील भरपूर मुले परिक्षा पास झाल्याचे आपल्या नजरेस पडते.
त्यानंतर त्यांनी त्यांच्या ४२ वर्षाच्या कालावधीत घडलेल्या काही गोष्टीचा त्यांनी उलघडा केला, पुरूषांच्या तूलनेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. शासनाच्या महत्त्वाच्या विभागात काम करण्याची संधी दिली जात नाही. राजकीय पुढा-यांचा देखील स्त्री अधिका-याकडून काम करून घेता येईल का अशी शंका असते. अशा ब-याच गोष्टी सांगितल्या. या कार्यक्रमाला ठाणे प्रतिष्ठान विभागाचे अध्यक्ष मुरलीधर नाले, उपाध्यक्ष महेश केळुस्कर आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नार्थचे अध्यक्ष रणवीरसिंह राठोड, सचिव अमोल नाले, यांची प्रमुख उपस्थिती होती.

औरंगाबाद विभागातर्फे 'अस्तू' चित्रपट प्रदर्शित




यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी या मासिक उपक्रमात जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत 'अस्तू' चित्रपट नूकताच औरंगाबाद मधील रूख्मिनी सभागृहात प्रदर्शित करण्यात आला.
आतापर्यत अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्ब्ल २७ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविणारा अस्तू चित्रपटाचे कथानक हे एका निवृ्त्त संस्कृत प्राध्यापक जे स्मृतीभ्रंश या आजाराने त्रस्त असतात. अशा व्यक्ती विषयावरती आधारलेला आहे. संस्कृत पंडीत असलेल्या चक्रपाणी शास्त्री यांना उतारवयात स्मृतीभ्रंश विकार होतो. वर्तमानाचा हात सोडून ते दुस-याच गोष्टीत रमू लागतात. अशी कथा या चित्रपटात आहे. जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अभिनेत्री अमृता सुभाष, इरावती हर्ष, देविका दफ्तरदार आणि मिलिंद सोमण आदी कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
चित्रपटानंतर जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी प्रेक्षकांसोबत चित्रपटाविषयी संवाद साधला. चित्रपटाच्या माध्यामातून अनेक प्रश्न मांडले व सोडविले जातात. हे माध्यम सजगतेने वापारायचे
आहे. त्यातून प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर माहिती मिळत असते. असे प्रतिपादन यांनी केले.
चित्रपट बघितल्यामुळे अनेक प्रश्न कळतात. मद्रासमध्ये मानसिक आजारासंदर्भात झालेल्या सर्वेक्षणात सत्तर टक्के लोकांना चित्रपटामुळे आजार समजल्याचे समोर आले आहे. चित्रपटातून प्रेक्षकांना नकळत खूप माहिती मिळते. स्मृतिभ्रंश हा आजार कसा असतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असेही आगाशे यांनी सांगितले. यावेळी एमजीएमचे सचीव अंकुशराव कदम, विनायक ब-हाळे, प्रविण सूर्यवंशी, सुबोध जाधव, प्रेरणा दळवी, मंगेश निरंतर यांच्यासह प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday 23 February 2017

‘चित्रपट चावडी’ प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘टू हाल्फ टाईम्स इन हेल’


नाशिक विभाग : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार २४ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध हंगेरीयन दिग्दर्शक झोल्टन फ्रॅब्री यांचा ‘टू हाल्फ टाईम्स इन हेल’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक- ४२२०१३. येथे दाखविण्यात येणार आहे.
हंगेरीयन कैदी व जर्मन सैनिक यांच्यात हिटलरच्या वाढदिवसानिमित्ताने फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात येते. सामन्याच्या निमित्ताने कैद्यांना विशेष सवलती दिल्या जातात. पंचपक्वान्नांचे जेवण दिले जाते. मात्र सामना रंगत असताना त्याची परिणीती एका भयंकर शोकांतिकेत होते. विलक्षण सिनेमाचा अनुभव घेण्यासाठी आपणांस आग्रहाचे निमंत्रण.
१९६१ मध्ये प्रदर्शित झालेल्या कृष्णधवल चित्रपटाचा कालावधी १२० मिनीटे आहे. ‘टू हाल्फ टाईम्स इन हेल’ हा चित्रपट बघण्यास नाशिककर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.मनोज शिंपी, कोषाध्यक्ष विनायक रानडे, सदस्य डॉ.कैलास कमोद, राजवर्धन कदमबांडे, सौ.कविता कर्डक, गुरमित बग्गा, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. सुधीर संकलेचा व विक्रम मोरे यांनी केले आहे.

हिरव्या बोलीचा शब्द कवी ना.धों. महानोर यांचा कृतज्ञता सत्कार...



आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निसर्ग कविता आणि ललित लेखनाने सा-या महाराष्ट्राला वेड लावलेल्या या रसिकप्रिय सुप्रसिद्ध कवी ना.धों. महानोर यांचा अमृत महोत्सवा निमित्त कृतज्ञता सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ४ मार्चला सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई मधील नवमहाराष्ट्र युवा अभियान विभागातर्फे होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरद पवार, मा. रामदास भटकळ, मा. शरद काळे आणि मा. हेमंत टकले यांची प्रमुख उपस्थिती असेल.
लेखनाच्या आणि शेतीसारख्या आवडत्या विषयाच्या आठवणी जागवत साजरा महोत्सव साजरा करावा, अशी कल्पना असून हा केवळ सत्काराचा औपचारिक कार्यक्रम न करता त्यानिमित्ताने महानोरांच्या लेखणीतून उतरलेली शब्दशिल्पे जिवंत व्हावीत, असा प्रतिष्ठानचा विचार आहे. त्या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. मुख्यत: सांस्कृतिक स्वरूपाच्या या कार्यक्रमात महानोरांचं वेगळेपण सांगणारी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणारी किंवा त्यांच्या साहित्याचे रसग्रहण करणारी काही मनोगतं दृकश्राव्य स्वरुपात सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचे अभिवाचन श्रीरंग देशमुख, अमृता मोरे, हेमंत टकले आणि दत्ता बाळसराफ यांच्या कडून करण्यात येणार आहे.