Wednesday 29 March 2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे गोविंदराव तळवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मृतिसभा..



व्यासंगी पत्रकार व साक्षेपी संपादक गोविंदराव तळवलकर यांचे २१ मार्चला निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे १ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता प्रतिष्ठानच्या जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग येथील रंगस्वर सभागृहात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरदरावजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्मृतिसभेचे आयोजन करण्यात आले आहे...
गोविंदराव तळवलकर यांच्या स्मृतिसभेला माजी मंत्री विनायकराव दादा पाटील, माधव आपटे, 'लोकसत्ता' चे संपादक गिरीश कुबेर, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर आणि प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले हे सहभागी होणार आहेत. या स्मृतिसभेत गोविंदराव तळवलकर यांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. तरी, या स्मृतिसभेस उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठातर्फे करण्यात आले आहे. 

अपंग हक्क विकास मंचतर्फे एकदिवसीय कार्यशाळा

अपंग हक्क विकास मंचतर्फे एकदिवसीय कार्यशाळा


स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबिवण्यात येणा-या घर तिथे शौचालय आणि सार्वजनिक स्वच्छता गृहामधील सोयी-सुविधा याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने त्याची बांधणी करताना सर्व प्रवर्गाच्या अपंगांसाठी अडथळा विरहीत सोईचे असावे याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंचाच्या वतीने ३० मार्चला गुरूवारी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५.३० पर्यंत  बोर्ड रूम, पाचवा मजला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे असेल. तसेच कार्यशाळेत वर्ल्ड बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी, या विषयावर काम करणारे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, राज्य शासनाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामीण भागातील प्रत्यक्ष लाभार्थी प्रतिनिधिक स्वरूपात उपस्थित राहून संवाद साधणार आहेत. 

Sunday 26 March 2017

छायाचित्र व स्केचेस प्रदर्शनाला कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    छायाचित्र व स्केचेस प्रदर्शनाला कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

नाशिक : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कलाक्षेत्रातही कौशल्य प्राप्त करता येते त्यासाठी परंपरेचे जतन आणि नव्याचा शोध घेण्याची धडपड कलावंतामध्ये असण्याची गरज आहे. कलेच्या निर्मितीतून स्वतःला आनंद तर मिळतोच पण त्यातून समाजाला विचारही देता येतो. छायाचित्र व स्केचेस प्रदर्शनातून हाच संदेश देण्याचा प्रयत्न युवा छायाचित्रकारांनी केला असे प्रतिपदान प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व विश्वास को-ऑप.बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मथुरा व वृंदावन येथील पारंपारिक होळी उत्सव व स्केचेसच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विश्वास ठाकूर पुढे म्हणाले की, नाशिकच्या अनेक कलावंतांमध्ये गुणवत्ता दडलेली आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे म्हणजेच त्यांच्यातल्या कलावंताला नवे अवकाश प्राप्त करून देणे होय असेही ते म्हणाले.
अनंत गुजराथी, अमित लव्हारे, निखिल देशमुख, अमोल शिंदे ह्या छायाचित्रकारांचे व आशिष देवपूरकर यांचे निवडक स्केचेस या प्रदर्शनात असून  अनंत गुजराथी यांच्या मथुरा व वृंदावन येथील पारंपारिक होळी उत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रांबरोबरच पोट्रेट फोटोग्राफी, लँडस्केप फोटोग्राफी, मॅक्रो (सूक्ष्म) फोटोग्राफीचा यात समावेश होता. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी विश्वास को-ऑप.बँकेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील, सुरेश वाघ, किशोर त्रिभुवन, कैलास आव्हाड, मंदार ठाकूर, रमेश गुजराथी, पौर्णिमा गुजराथी, रमेश चिखले, राजेंद्र शिंदे, ज्योती शिंदे, सुरेश लव्हारे, मंगला लव्हारे, प्रसाद देवपूरकर, संगीता देवपूरकर, चित्रकार बबन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नाशिककर कलाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

Saturday 25 March 2017

छायाचित्रांसह स्केचेसचे प्रदर्शन

छायाचित्रांसह स्केचेसचे प्रदर्शन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक,विश्वास को-ऑफ-.बँक लि नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी आणि रिसर्च इंस्टिट्यूट ,नाशिक सारस्वत बँक व रेडीओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडीओ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सवांचे कलात्मक दर्शन घडवणाऱ्या अभिनव छायाचित्रांचे व स्केचेसच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वास को-ऑफ-बँक लि.,सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक येथे आज या कार्यक्रमाला सुरूवात झाली असून रविवारी सकाळी ११.०० ते रात्री ९.०० पर्यंत हे प्रर्दशन सर्वांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व विश्वास को-ऑफ-.बँकचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांचे शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.अनंत गुजराथी,अमित लव्हारे,निखील देशमुख,अमोल शिंदे ,या युवा छायाचित्रकरांचे छायाचित्रे आशिष देवपूरकर यांचे निवडक स्केचेस या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.

Wednesday 22 March 2017

"वर्ल्ड डाऊन सिंन्ड्रोम डे " निमित्त कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये "वर्ल्ड डाऊन सिंन्ड्रोम डे " निमित्त कार्यशाळा संपन्न 


"वर्ल्ड डाऊन सिंन्ड्रोम डे "चे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच आणि पॅरेंन्टस् ऑफ डाऊन सिंड्रोम असोसिएशन मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दि. २१ मार्च २०१७ रोजी  यशवंतराव चव्हाण केंद्राच्या चौथ्या मजल्यावरील सांस्कृतिक सभागृहामध्ये मुलांच्या पालकांसाठी प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सकाळी साडेनऊ वाजता सुरु झालेल्या कार्यक्रमास प्रथम प्रार्थना नृत्याने  डाऊन सिंड्रोम असलेल्या विशेष मुलांनी  सुरेख सादरीकरण केले. या कार्यशाळेसाठी राज्याचे अपंग कल्याण विभागाचे आयुक्त मा. न्मितीन पाटील (भा.प्रा.से),  डॉ. अशोक खनवटे, प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. अंजली छाब्रिया, शिक्षणतज्ञ मिनाक्षी बालसुब्र्यमण्यम, प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. समीर दलवाई आदींनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी नितीन पाटील यांनी राज्याच्या होऊ घातलेल्या धोरणांमध्ये या विशेष मुलांसाठी तरतुदी केल्या असून आता प्रत्येक सामान्य शाळांमध्ये विशेष शिक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे कळवले. डॉ. खनवटे यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सध्या भाषेत या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पालकांनी व समाजानी काय केले पाहिजे हे तंत्रशुद्ध पद्धतीने सांगितले. यावेळी मुले आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ आणि मनोविकारतज्ञ असलेल्या डॉ. अंजली छाब्रिया यांनी या मानसोपचार आणि मनोविकार यांतील फरक आणि समाजामध्ये उपचाराबद्दल असलेला गैरसमज आणि भीती याबाबतची सविस्तर माहिती दिली. त्यांनी असे विषद केले की, प्रत्येक व्यक्तीला मग तो डाऊन सिंड्रोम असो अथवा नसो, सल्ला व मार्गदर्शनाची गरज असते.    
डॉ. समीर दलवाई यांनी डाऊन सिंड्रोम विद्यार्थ्यांचे शीघ्र निदान आणि धीघ्र हस्तक्षेप करून योग्य तो उपचार आणि थेरेपी देणे तसेच व्यक्तिमत्व विकासावर लक्ष देऊन पालकांनी या मुलांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत केली पाहिजे. मीनाक्षी बालसुब्रह्मण्यम यांनी या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध कला ,क्रीडा, योगा आणि नृत्य आदींच्या मदतीने मुलांचा व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी पालकांच्या संस्थेचे प्रमुख गोपाल सेहेजपाल प्रतिष्ठानचे विजय कान्हेकर, मिनिता पाटील,नंदकुमार फुले, मीना मुथा, श्यामश्री भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मणिहार भाटे यांनी आभार मानले.    
 आये फिर आये फिर से रानीला मेहमान या गाण्याने कार्यक्रम संपन्न झाला. अपंग हक्क विकास मंचचे विजय कसबे, रमेश सांगळे, रमेश मोरे,  अनिल चाळके, महेश साळवी आणि मनिषा खिल्लारे यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

Friday 17 March 2017

सस्नेह निमंत्रण...

सस्नेह निमंत्रण...
शिक्षणप्रेमींनी शिक्षणाविषयी
काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पद्धतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच 'शिक्षणकट्टा’.
शिक्षणतज्ज्ञ , मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, पालक, विद्यार्थी यांना घेऊन हा कट्टा गेली पाच वर्ष सुरू आहे. यावेळी हा कट्टा शनिवार, दिनांक १ एप्रिल २०१७ रोजी दुपारी २ वाजता , बोर्ड रूम ,पाचवा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई येथे आयोजित केला आहे. यावेळी शिक्षण कट्ट्यावर ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम 'हा विषय ठेवण्यात आला आहे. सदर कार्यक्रमास लवकरच दोन वर्षे पूर्ण होतील .या अनुषंगाने पुढील मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
१) हा कार्यक्रम सद्ध्या शाळास्तरावर कशा प्रकारे सुरु आहे ?
२) या कार्यक्रमामुळे शाळांमध्ये कोणते बदल दिसून येत आहेत?
३) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना आलेले अनुभव.
४) हा कार्यक्रम अधिक प्रभावी कशाप्रकारे करता येईल.
उपरोक्त सर्व मुद्द्यांवर येत्या कट्ट्यात चर्चा होईल.
‘शिक्षण विकास मंच’ चे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे. तरी आपण कट्ट्यात सहभागी होऊन आपले विचार मांडावेत ही विनंती.
बसंती रॉय
संयोजक
शिक्षणकट्टा, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
स्थळ : बोर्ड रूम , पाचवा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ,
मंत्रालय समोर, नरीमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१
अधिक माहितीसाठी संपर्क – माधव सूर्यवंशी (समन्वयक-९९६७५४६४९८)
* टीप : सदर चर्चेमध्ये आपला सहभाग प्रभावी होण्याकरिता प्र.शै.म.कार्यक्रमाचे दि.२२ जून व दि.१० जुलै २०१५ तसेच दि. ६ जानेवारी २०१७ चे शासन निर्णय पहावेत

Thursday 16 March 2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी ‘दी बॉईज ऑफ द पॉल स्ट्रीट’


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार १७ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध हंगेरीयन दिग्दर्शक झोल्टन फ्रॅब्री यांचा ‘दी बॉईज ऑफ पॉल स्ट्रीट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
 सन १९०० मध्ये बुडापेस्ट मधील शाळकरी मुलांच्या दोन गटांमध्ये एका मोकळ्या जागेच्या ताब्यासाठी संघर्ष होतो. खरे तर मोकळे मैदान व शाळकरी मुले ही देश आणि सैनिक सेना यांची प्रतिकेतर नाहीत ना? लहान मुलांच्या खेळातुन काही वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या सिनेमातुन देण्यात आला आहे. वरवर सोप्या वाटणार्‍या प्रश्‍नाच्या मागे सोपी उत्तरे नसतात. काय नक्की झाले ते पाहण्यासाठी जरूर या. १९६९ मध्ये हंगेरी येथे प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा कालावधी ११० मिनीटे आहे.‘दी बॉईज ऑफ पॉल स्ट्रीट’ हा चित्रपट बघण्यास नाशिककर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.मनोज शिंपी, कोषाध्यक्ष विनायक रानडे, सदस्य डॉ.कैलास कमोद, राजवर्धन कदमबांडे, सौ.कविता कर्डक, गुरमित बग्गा, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. सुधीर संकलेचा व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Wednesday 15 March 2017

औरंगाबाद येथे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन १५ व १६ एप्रिल रोजी...



औरंगाबाद येथे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन १५ व १६ एप्रिल रोजी...
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शिक्षक साहित्यिक बालाजी मदन इंगळे तर
स्वागताध्यक्षपदी आ. विक्रम काळे यांची निवड...

औरंगाबाद विभाग : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई- विभागीय केंद्र औरंगाबाद, शिक्षण विकास मंच व महात्मा गांधी मिशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध शिक्षक साहित्यिक बालाजी मदन इंगळे ( उमरगा, जि. उस्मानाबाद ) यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे संमेलनाच्या निमंत्रक असून या संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी मराठवाडा शिक्षक मतदासंघाचे आ. विक्रम काळे यांची निवड संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
औरंगाबाद येथे शनिवार, दि. १५ व रविवार दि. १६ एप्रिल २०१७ रोजी सदरील संमेलन कै. वसंतराव काळे स्मृती साहित्यनगरी, रुख्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, सेव्हन हिल्स, औरंगाबाद या ठिकाणी संपन्न होईल.
अभ्यासक्रमाशी संबंधित विषयांवर, शैक्षणिक विषयांवर लिहिणारे (शिक्षणातील नवीन प्रवाह, शैक्षणिक समस्या, इत्यादी ) आणि ललित साहित्य ( कथा, कविता, नाटक, कादंब-या इत्यादी ) अशा तिन्ही अंगांनी लेखन करणारे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तिन्ही स्तरांवर काम करणारे अनेक शिक्षक महाराष्ट्रात आहेत. अशा शिक्षकांना एकत्र येऊन आपले विचार, कल्पना आणि अनुभव यांची देवाण-घेवाण करत यावी, अशा लिहित्या शिक्षकांना साहित्यिक म्हणून ओळख मिळावी व त्यांच्याकडून अधिकाधिक साहित्य निर्मिती व्हावी, हा या संमेलन आयोजनाचा प्रमुख उद्देश आहे. यापुर्वी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( विद्या परिषद ) आणि शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २०१२ साली पुण्यात पहिले राज्यस्तरीय शिक्षकांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले होते.
याचबरोबर वाचन संस्कृती वाढावी व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठीही हे संमेलन निश्चितच दिशादर्शक ठरेल. पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनात केवळ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचाच सहभाग घेण्यात आला होता. यावेळी उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांची मागणी लक्षात घेऊन दुस-या शिक्षक साहित्य संमेलनात त्यांनासुद्धा सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दोन दिवसीय संमेलनात विविध परिसंवाद, प्रकट मुलाखत, कविसंमेलन, कथाकथनासह सास्कृतिक कार्यक्रम देखील सादर होणार आहेत. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकवणा-या आणि ललित किंवा शैक्षणिक विषयावर लेखन करणा-या शिक्षकांना या संमेलनात सहभागी होता येईल. नाममात्र प्रतिनिधी शुल्कात निवास, भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या शिक्षकांना या संमेलनात प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी shikshaksahitya@gmail.com या मेल आयडीवर अथवा अभ्युदय फाऊंडेशन, कासलीवाल सुवर्णायोग, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड, गारखेडा परिसर, औरंगाबाद - ४३१००५ (दूरध्वनी क्र. ०२४०-२३५१७७९ ) येथे संपर्क साधावा.

संमेलनाच्या ऑनलाइन नोंदणीची सुरुवात करण्यात आलेली असून खालील लिंकवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून आपला सहभाग निश्चित करावा,असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
Link : http://bit.ly/ShikshakSahityaForm


'विरंगुळा'येथे १०४ वी जयंती उत्साहात

कराड : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कराड मध्ये मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला कराड आणि सातारा परिसरातून मोठ्या अधिक प्रमाणात लोकांची गर्दी होती. सुरूवातीला चव्हाण साहेबांच्या निवासस्थानी 'विरंगुळा' येथे त्यांचे पुतणे अशोकराव गणपतराव चव्हाण यांनी प्रतिमांना पुष्पहार घातला. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि सौ. वेणूताई कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी विजय चौक, दत्त चौक, आझाद चौक, नेहरू चौक, चावडी चौक आणि कृष्णा नदी अशी पदयात्रा काढली. पी. डी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने कराड शहरातील सर्व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याचे समूहगान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान समोरील भव्य प्रांगणात झाले. कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

'पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ'...

'पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ'...

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे एमजीएमच्या आईन्स्टाईन सभागृहात रविवार १२ मार्च २०१७ रोजी 'पाच राज्यांतील निवडणूक निकालांचा अन्वयार्थ' यावर परिसंवाद घेण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रा. जयदेव डोळे, प्रविण बर्दापूरकर, पत्रकार अमेय तिरोडकर, एमजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, प्रतिष्ठानच्या सदस्या रेणुका कड, सुबोध जाधव, सुहास तेंडुलकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यशवंतरावांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर श्रीकांत देशपांडे यांनी संवादकाच्या भूमिकेतून तज्ज्ञांना बोलते केले. 

उत्तर प्रदेशांतील निकालांनी बहुसंख्याकवादाचा धोका वाढल्याचा सूर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई- विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित परिसंवादात राजकीय विश्लेषकांनी काढला. सूक्षम प्रचातंत्र आणि घटनाबाह्य सत्ताकेंद्राच्या मदतीने निवडणूक जिंकण्याचे तंत्र भाजपने विकसित केले असून, व्हॉट्सअॅप, टि्वटर, फेसबुक आणि टीव्हीशी सतत कनेक्टेड असलेल्या १४ टक्के तरुणासमोर मोदी यशस्वीपणे कनेक्ट होतात, हे या यशाचे गमक असल्याचे ते म्हणाले. 
प्रवीण बर्दापूरकर यांनी उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांचा आढावा घेत परिसंवादास सुरुवात केली. ते म्हणाले, "उत्तर प्रदेशात हिदू मुस्लीम तेढ, ब्राह्मण, दलित आणि यादव यांच्याभोवती सर्व राजकारण केंद्रीत असते. छोट्या जातींची मते मिळविण्यासाठी भाजपने बसपातून मौर्यांना फोडले. कुर्मी, लोथ, मल्लाव, गुर्रियोज, कुंभार अशा दोन ते तीन टक्के बळच्या जातींची मोळी बांधली."

यशवंतरावांच्या विकासविषयक उद्गारांचे श्रोत्यांना स्मरस करुन देत प्रा. जयदेव डोळे यांनी आपले विश्लेषण केले. ते म्हणाले, "संघाचा अजेंडा पूर्ण ताकदीने राबविण्याची सुरुवात उत्तर प्रदेशापासून झाली आहे. एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकीट न देता आपण १०० टक्के हिंदू पक्ष म्हणून उदयास येत आहोत, हा संदेश भाजपने दिला आहे. अखिलेश यादवने महिला, युवक यांना केंद्रस्थानी ठेवून विकासाचे राजकारण करण्याचा, पक्षातील गुंडगिरी दूर करण्याचा प्रयत्न केला, हे कुणी सांगत नाही, भाजपने पैसा, गुंडगिरी, जात या सगळ्यांचा वापर केला. सत्ता आल्यानंतर संविधानातील तरतुदींना सुरुंग लावण्याचा प्रयत्न होण्याची भीती आहे. भाजपेतर विचारांची ताकद गोळा करून पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये उभे राहावे लागेल." असे सांगत प्रा. डोळे यांनी यशवंतरावांच्याच पुस्तकातील परिच्छेदानने भाषणाचा समारोप केला. 
तर "उत्तर प्रदेशात भाजपने बिगर यादव ओबीसी आणि बिगर जाटव दलित यांची मोट बांधली आणि यश मिळविले. २०१४ चा परफॉर्मन्स पुन्हा दाखविणे अवघड काम आहे," असे निरिक्षण पत्रकार अमेय तिरोडकर यांनी वर्तविले. "पंजाबात आम आदमी पक्षाने खलिस्तान समर्थकांना तिकिटे दिल्याचे अहवाल आहेत. त्यामुळे तिथे आप हरणे आवश्यक होते, असेही श्री तिरोडकर म्हणाले.

श्रीकांत देशपांडे यांनी तिन्ही वक्त्यांच्या विश्लेषणातील मुद्यांना स्पर्श करत आपली निरीक्षणे मांडली. सुहास तेंडुलकर यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

हरवत चाललेला संवाद धोकादायक...

हरवत चाललेला संवाद धोकादायक...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागातर्फे 'आपली बदलती संस्कृती' या विषयावर व्याख्यान ११ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले होते त्यावेळी डॉ. अनिल अवचट व्याख्यानात आपल्या सभोवतालच्या समाजामध्ये आत्मसंतुष्टपणा वाढल्याने जगण्यात पोकळी निर्माण झाली आहे. निर्माण झालेल्या अप्पलपोटी संस्कृतीमुळे जीवनातील संवाद हरवत चालला असल्याचे मत डॉ. अनिल अवचट यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'आपली बदलती संस्कृती' या विषयावर बोलताना व्यक्त केले.

विश्वास लॉन्स परिसरातील डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग सेंटरच्या सभागृहात या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानात पुढे बोलताना डॉ. अवचट यांनी खुंटत चाललेला संवाद रोखण्यासाठी माणुसकीचं नातं बळकट करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. फेसबुक, व्हॉट्स अॅप यांसारख्या समाज माध्यमांमुळे निर्माण होणा-या आभासी जगात माणसे एकमेकांपासून दुरावत चालली आहेत, तसेच समाजाची योग्य जडणघडण होतानादेखील दिसत नसल्याचे सांगताना अवचट यांनी पर्यावरणाचा -हास थांबविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विश्वास ठाकूर यांनी केले.

"यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार"

"यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार"
आधार कार्डचे प्रणेते नंदन निलेकणी यांना प्रदान...

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात आधारकार्डचे प्रणेते नंदन निलेकणी यांना २०१६ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप रुपये ५ लाख रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमांचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केले यावेळी त्यांनी असे सांगितले की यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान'च्या माध्यमातून पूर्ण करत आहोत. त्यानंतर "यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार" समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी राष्ट्रीय पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती दिली. या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले.
नंदन निलेकणी यांनी पुरस्कार स्विकारल्यावर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आधार कार्ड तयार करत असताना किती यातना झाल्या आणि आव्हान स्विकारल्या नंतर पूर्ण करत असताना लोकांनी कशी मदत केली हे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत डिजिटल वाटचाल करत असताना आधार कार्डचा फायदा कसा होईल, भविष्यात काय करता येईल हे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केले.

Tuesday 14 March 2017

'लाईटर साईड ऑफ ग्रॅव्हीटी'विषयावर रंगले ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान..

'लाईटर साईड ऑफ ग्रॅव्हीटी'विषयावर रंगले
ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान..


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा'चे तेरावे पुष्प ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांचे 'लाईटर साईड ऑफ ग्रॅव्हीटी' या विषयावरील व्याख्यान १४ मार्च रोजी चव्हाण सेंटरमध्ये पार पडले. डॉ. जयंत नारळीकर यांनी या व्याख्यानांत गुरुत्वाकर्षणाविषयी सांगताना आकाशगंगा भव्य नृत्य एक सफरचंद ड्रॉप, गुरुत्व कॉसमॉसमध्ये सर्वव्यापी आहे, गुरुत्व फिकट साईट सर्व रुपे या शक्ती इंद्रियगोचर एक सुंदर स्पष्ट आणि पूर्णपणे nontechnical परिचय सादर करतो, आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे असे अनेक मुद्यांवर माहिती देताना श्रोत्यांना मनोरंजक असे असंख्य दाखले दिले. त्यामुळे श्रोत्यांपर्यंत ते उत्तमरित्या पोहोचले व अतिशय रंगले.

Saturday 11 March 2017

शरद पवार व जब्बार पटेल यांना पुरस्कार

शरद पवार व जब्बार पटेल यांना पुरस्कार 
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी विविध ग्रंथ पुरस्कारांशिवाय दोन विशेष वाड्मय पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा आज साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली. कै. यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या मराठी भाषाविषयक कामाबद्दलची कृतज्ञता म्हणून परिषदेने यशवंतराव चव्हाण २००७ पासून हा पुरस्कार सुरू केला असून ते चरित्र, आत्मचरित्र आणि किंवा राजकिय स्वरूपाचे लेखन यातील मागील तीन वर्षात प्रसिध्द झालेल्या सर्वोत्कृष्ट ग्रंथास देण्यात येतो. २०१७  च्या पुरस्कारासाठी डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली मसापने नियुक्त केलेल्या निवड समितीने शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्राची निवड केली आहे.  

Wednesday 8 March 2017

'आपली बदलती संस्कृती' विषयावर व्याख्यान

'आपली बदलती संस्कृती' विषयावर व्याख्यान 

नाशिक : राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची १०४ वी जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि विभागीय केंद्र नाशिक यांच्याकडून 'आपली बदलती संस्कृती' या विषयावर व्याख्यान आयोजीत केले आहे. हा कार्यक्रम शनिवारी ११ मार्चला सायंकाळी ६ वाजता सुरू होईल.  विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सुप्रसिध्द लेखक डॉ. अनिल अवचट वक्ते असून हा कार्यक्रम डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब( विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बॅंकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे होणार आहे.  

Monday 6 March 2017

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार सोहळा

राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची १०४ वी जयंती १२ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१६’ हा पुरस्कार आधार कार्डचे प्रणेते नंदन निलेकणी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा परिसंवाद

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा परिसंवाद 

औरंगाबाद विभाग : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १०४ व्या जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद, यांच्याकडून 'पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ' या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रमाला रविवारी १२ मार्चला आईन्टाईन हॉल, जेएनईसी महाविद्यालयात (औरंगाबाद) सकाळी ११ वाजता सुरूवात होईल. कार्यक्रमामध्ये जयदेव डोळे, प्रवीण बर्दापूरकर, अमेय तिरोडकर आणि श्रीकांत देशपांडे हे प्रमुख वक्ते असतील. 

बीडमध्ये रंगणार पहिले जिल्हास्तरीय बालसाहित्य संमेलन

बीडमध्ये रंगणार पहिले जिल्हास्तरीय बालसाहित्य संमेलन 


बीड विभाग : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र अंबाजोगाई, बीड आणि सौ. के. एस. के. महाविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले जिल्हास्तरीय मराठी बालसाहित्य संमेलन ९ आणि १० मार्च रोजी सानेगुरूजी साहित्य नगरी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यीक महावीर जोंधळे, उद्धाटक ज्येष्ठ साहित्यीक - भारत सासणे, प्रमुख अतिथी - दत्ता बाळसराफ आणि वसंत काळपांडे, प्रमुख उपस्थीती भारतभूषण क्षीरसागर आणि निलेश राऊत, कार्याध्यक्ष दीपा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थीती असेल.
कार्यक्रमाची रूपरेषा- गुरूवारी ९ तारखेला सायंकाळी ५ वाजता ग्रंथदिंडी, मार्ग : माळीवेस - टिळकरोड - धोंडिपुरा - बलभीम चौक - कारंजा - राजूरीवेस - छ. शिवाजी महाराज चौक मार्गी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास सांस्कृतीत कार्यक्रम होईल. १० तारखेला सकाळी उद्घाटन सोहळा. दुपारी १ ते २ बाल साहित्यीकाचे कवीसंमेलन, दुपारी २ ते ३ बाल साहित्यीकाचे कथाकथन,  दुपारी ३.३० ते ४.३० निमंत्रीत लेखकांचे कथाकथन, दुपारी ४.३० ते ५.३० निमंत्रीत कवींचे कवीसंमेलन आणि सायंकाळी ५.३० वाजता समारोप कार्यक्रम असेल. अध्यक्ष डॉ. व्दारकादास लोहिया, उपाध्यक्ष श्री. दगडू लोमटे, सचिव नरेंद्र काळे, कोषाध्यक्ष उषाताई दराडे, अमीर हबीब यांनी  सर्व रसिकांना या साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा हि विनंती केली आहे. 

Saturday 4 March 2017

शरद पवारांनी जपला मैत्रीचा ओलावा – कवीवर्य ना. धो. महानोर









आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निसर्ग कविता आणि ललित लेखनाने सा-या महाराष्ट्राला वेड लावलेल्या या रसिकप्रिय सुप्रसिद्ध कवी ना.धों. महानोर यांचा अमृत महोत्सवा निमित्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कृतज्ञता सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम ४ मार्चला सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईमध्ये संपन्न झाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये कवी महानोर यांच्या जीवनाचा आतापर्यंतचा प्रवास फोटो व चलचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आला.

कार्यक्रमाचे निवेदन गोपाळ अवटी आणि प्रज्ञा सागडे यांनी मोजक्या शब्दात करून उपस्थिताची मने जिंकली. कार्यक्रमाला सुप्रियाताई सुळे, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील, जब्बार पटेल, रामदास भटकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरूवातीला या कार्यक्रमाचे महानोर यांच्या कवितेचे अभिवाचन श्रीरंग देशमुख, अमृता मोरे, हेमंत टकले आणि दत्ता बाळसराफ यांनी केले. त्यानंतर रामदास भटकळ यांनी त्यांच्या आयुष्यात बदल करणारे महानोर कवींचा जीवनपट रसिकांसमोर उलघडला. लेखनाच्या आणि शेतीसारख्या आवडत्या विषयाच्या आठवणी जागवत साजरा महोत्सव साजरा करावा, अशी कल्पना असून हा केवळ सत्काराचा औपचारिक कार्यक्रम न करता त्यानिमित्ताने महानोरांच्या लेखणीतून उतरलेली शब्दशिल्पे जिवंत व्हावीत, असा प्रतिष्ठानचा विचार आहे. त्या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. मुख्यत: सांस्कृतिक स्वरूपाच्या या कार्यक्रमात महानोरांचं वेगळेपण सांगणारी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणारी किंवा त्यांच्या साहित्याचे रसग्रहण करणारी काही मनोगतं दृकश्राव्य स्वरुपात सादरीकरण करण्यात आली.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी कवीच्या लहान पणापासूनची आतापर्यंत असलेले संबंध काही मोजक्या शब्दात मांडले. त्यामध्ये शेती, आमदार, प्रश्न मांडण्याचे कौशल्य, शेतकरी दिंडी या विषयांच्या आठवणी ताज्या करून दिल्या. त्यानंतर कवी महानोर यांनी केलेल्या सत्काराला भारावून गेलो आहे असे सांगून भाषनाला सुरूवात केली. त्यांचे यशवंतराव चव्हाण यांच्याशी असलेले संबंधाशी त्याच्या कवीच्या अदाकारीत ओळख सांगितली. पवार साहेबांवर नेहमी सारखे गमंतीशीर किस्से त्यांनी सांगून पत्र वाचनाला सुरूवात केली. कार्यक्रमाचा शेवट त्यांच्या कवीतेने केला...

Thursday 2 March 2017

‘चित्रपट चावडी’ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘दि फिफ्थ सील’



नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत शुक्रवार 3 मार्च 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुप्रसिद्ध हंगेरीयन दिग्दर्शक झोल्टन फ्रॅब्री यांचा दि फिफ्थ सील हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-422013 येथे दाखविण्यात येणार आहे.
            बुडापेस्ट, 1944 दुसर्‍या महायुद्धाचा अखेरचा काळ. एक घड्याळजी, पुस्तकविक्रेता आणि सुतार असे तिघे मित्र एका बारमध्ये बार मालकाबरोबर मद्याचा आस्वाद घेत गप्पा मारत असतांना तिथे एक अनोळखी व्यक्ती येते. घड्याळजी एक सैंधांतिक प्रश्न सर्वांसमोर ठेवतो. त्यातुन त्या सर्वांचे जीवनच बदलून जाते. वरवर सोप्या वाटणार्‍या प्रश्नाच्या मागे सोपी उत्तरे नसतात. काय नक्की झाले ते पाहण्यासाठी जरूर या.

            1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या रंगीत चित्रपटाचा कालावधी 105 मिनीटे आहे. दि फिफ्थ सील हा चित्रपट बघण्यास नाशिककर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.मनोज शिंपी, कोषाध्यक्ष विनायक रानडे, सदस्य डॉ.कैलास कमोद, राजवर्धन कदमबांडे, सौ.कविता कर्डक, गुरमित बग्गा, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. सुधीर संकलेचा व विक्रम मोरे यांनी केले आहे.