Sunday 22 April 2018

कोचिंग क्लासेस मुलांच्या सृजनशीलतेला मारक...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या वेळच्या शिक्षणकट्टयात "खाजगी कोचिंग क्लासेस" या विषयावर चर्चा झाली. न्यायालयाकडून खाजगी कोचिंग क्लासेस वरती नियंत्रण ठेवण्याचे निर्देश शासनास दिल्याने शासनातर्फे विधेयकाचा कच्चा मसुदा तयार झाला आहे. त्यावर शिक्षणकट्टयात चर्चा करण्यात आली.

ही चर्चा का ठेवण्यात आली ..? या विषयीची भूमिका श्रीमती बसंती रॉय यांनी उपस्थितांना सांगितली. कोचिंग क्लासेस ही आजच्या समाजाची भावनिक गरज बनली आहे. यास पालक , शिक्षक आणि आजची परीक्षा पद्धती कारणीभूत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होतो. म्हणून हे धोरण ठरविताना विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवावा. त्याचा विकास शाळा आणि क्लास दोघांच्याही समन्वयाने करावा. या विधेयकातून लहान आणि मराठी माध्यमाचे क्लासेस वगळण्यात यावेत. अशीही धारणा काही सदस्यांनी शिक्षणकट्टयात व्यक्त केली.

खाजगी क्लासेस मुलांना परीक्षार्थी बनवतात तोच तो अभ्यासक्रम पुन्हा पुन्हा करून घेतात याने मुलांची सृजनशीलता मरून जाते याकडे शिक्षण विकास मंचचे संयोजक डॉ. वसंतराव काळपांडे यानी लक्ष वेधले. या कार्यक्रमास मोठया प्रमाणात शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक,पालक, पत्रकार याची उपस्थिती होती. शेवटी उपस्थितीचे आभार समन्वयक माधव सूर्यवंशी यांनी मानले.

No comments:

Post a Comment